नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई  सॅमसंग कंपनीच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी नोएडा दौऱ्यावर आहेत. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगची भारतातील 5 हजार कोटी रुपयांची ही सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. नरेंद्र मोदी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी 9 जुलैला जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत सॅमसंगने दरवर्षी 12 कोटी मोबाईल बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यूपी सरकारने जीएसटीत कंपनीला सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. सॅमसंगच्या या प्रकल्पाची प्राथमिक बोलणी यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारशी झाली होती. पण काही कारणांमुळे उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार स्थापनेनंतर सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी लखनौला आले होते. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.