नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर सुरु असलेला वाद आता थांबण्याची शक्यता आहे. गुजरात विद्यापीठाने नरेंद्र मोदी यांच्या एमएच्या डिग्रीची माहिती सार्वजनिक केली आहे. विद्यापीठाच्या रेकॉर्डनुसार, पंतप्रधान मोदी फर्स्ट डिव्हिजनमधून एमए उत्तीर्ण आहेत.

 

पंतप्रधान मोदी राज्यशास्त्रात 62.3 टक्के मिळवत ‘फर्स्ट क्लास’

 

गुजरात विद्यापीठाकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे राज्यशास्त्रात 62.3 टक्के मिळवत फर्स्ट क्लासमध्ये एमए उत्तीर्ण आहेत. मोदींनी एमएच्या पहिल्या वर्षात 400 गुणांपैकी 237 आणि दुसऱ्या वर्षात 400 गुणांपैकी 262 मिळवले होते. एमएच्या एकूण गुणांपैकी म्हणजेच 800 पैकी 499 गुण मोदींना मिळाले होते.

 

दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. केजरीवाल यांच्या मागणीनंतर केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला आदेश दिले होते की, मोदींच्या शिक्षणासंबंधी माहिती उघड करावी.

 

गुजरात विद्यापीठच्या माहितीनुसार, 1983 मध्ये राज्यशास्त्रात एमएचं शिक्षण पूर्ण केलं. यामध्ये पॉलिटिकल सायन्स, इंडियन पॉलिटिकल अनॅलिसिस आणि सायकॉलॉजी ऑफ पॉलिटिक्ससारखे विषय होते.

 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाने माहिती अधिकाराअंतर्गत मोदींच्या डिग्रीबाबत माहिती देण्यास मनाई केली होती. मात्र, अखेर गुजरात विद्यापीठानेच मोदींच्या शिक्षणाबाबत माहिती समोर आणली आहे.

 

याआधी गुजरात विद्यापीठाचं म्हणणं होतं की, आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती उघड करु शकत नाही. शिवाय, 20 वर्षांपूर्वीची माहिती माहिती अधिकाराअंतर्गतही दिली जाऊ शकत नाही, असेही विद्यापीठाने म्हटलं होतं. भारत सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी 1978 साली दिल्ली विद्यापीठातून बीएचं शिक्षण पूर्ण केलं.