PM Modi Diwali : दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलला दौऱ्यावर आहेत. कारगिलमध्ये त्यांनी भारतीय लष्करातील जवानांना संबोधित केले. 'मी देशाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सीमेवर दिवाळी साजरी करणे हे एक सौभाग्य आहे. भारत आपले सण प्रेमाने साजरे करतो. लष्करातील कर्मचारी माझे कुटुंब आहेत, असे पंतप्रदान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी कारगिल युद्धाचाही यावेळी उल्लेख केला. "पाकिस्तानशी अशी एकही लढाई झालेली नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकावला नाही. दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवण्याचा उत्सव. कारगिलनेही तेच केले. त्यात कारगिलमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादाचा नाश केला होता. मी ते युद्ध जवळून पाहिले होते. अधिकाऱ्यांनी मला 23 वर्षांचा जुना फोटो दाखवला. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, तुम्ही मला त्या क्षणांची आठवण करून दिली. माझ्या कर्तव्याच्या मार्गाने मला त्या क्षणांची आठवण करून दिली. देशाने पाठवलेली मदत सामग्री घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यावेळच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी कधीही विसरू शकत नाही, अशा भावणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पाकिस्तानला तंबी
पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकिस्तानला तंबी दिली. "आज भारत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला सशक्त बनवत आहे. दुसरीकडे ड्रोनवरही वेगाने काम करत आहे. आम्ही त्या परंपरेचे पालन करणार आहोत, जिथे आम्ही युद्धाला पहिला पर्याय मानत नव्हतो. आम्ही नेहमीच युद्ध हा शेवटचा पर्याय मानला आहे. युद्ध लंकेत झाले की कुरुक्षेत्रात, आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. आम्ही जागतिक शांततेचे समर्थक आहोत, पण शक्तीशिवाय शांतता शक्य नाही. पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले, जर कोणी आमच्याकडे पाहिलं तर आमच्या तिन्ही सैन्याला शत्रूला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर द्यायचं हे माहीत आहे.
पीएम मोदी म्हणाले, "मला तुम्हाला आणखी काही द्यायचे आहे, आपला भारत एक जिवंत व्यक्तिमत्व आहे, एक अमर अस्तित्व आहे. जेव्हा आपण भारताबद्दल बोलतो तेव्हा शौर्याचा वारसा आठवला जातो. जेव्हा देशातील लोक स्वच्छतेच्या मिशनमध्ये सामील होतात, गरिबांना पक्के घर, पिण्याचे पाणी, वीज आणि गॅस यासारख्या सुविधा विक्रमी वेळेत मिळतात, तेव्हा प्रत्येक सैनिकाला अभिमान वाटतो.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, आज देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. एकीकडे तुम्ही सीमेवर उभे आहात, तर तुमचे तरुण मित्र नव्याने सुरुवात करत आहेत. दोन दिवसांपूर्वी इस्रोने 36 उपग्रह प्रक्षेपित करून नवा विक्रम केला आहे.
पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा युक्रेनमध्ये लढा सुरू झाला तेव्हा आपला लाडका तिरंगा भारतीयांसाठी संरक्षण कवच बनला. आज जागतिक स्तरावर भारताचा मान वाढला आहे. भारताची वाढती भूमिका सर्वांसमोर आहे. भारत आपल्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शत्रूंविरुद्ध यशस्वी आघाडी घेत आहे. सीमेवर ढाल बनून उभे असाल तर देशाच्या आतही देशाच्या शत्रूंवर कडक कारवाई केली जात आहे.