नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून तीन महिन्यांच्या दौऱ्यांचा तपशील मागवला आहे. सोमवारी हा तपशील पीएमओकडे मंत्र्यांना सादर करावा लागेल. मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी हा तपशील मागवला असल्याची माहिती आहे.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून मंत्र्याच्या दौऱ्याचा तपशील जमा केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मोदींनी याबाबत आदेश दिल्याची माहिती आहे.
नोटाबंदीनंतर मोदींनी सर्व मंत्र्यांना आणि भाजपच्या खासदारांना आपापल्या मतदार संघात जाऊन नोटाबंदीचे फायदे आणि सरकारी योजनांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्याचाच आढावा घेण्यासाठी दौऱ्याचा तपशील मागवला असल्याचं बोललं जात आहे.
मंत्र्यांनी किती ठिकाणी सरकारी योजनांची माहिती पोहचवली, याचा आढावा दौऱ्याच्या तपशीलातून घेतला जाणार आहे.
काय आहेत मोदींचे आदेश?
सर्व मंत्र्यांना 3 महिन्यात केलेल्या दौऱ्याचा तपशील द्यावा लागेल. एखाद्या मंत्र्याने कुठेच दौरा केला नसेल, तर आपण दिल्लीत असल्याचं आणि त्या काळात दिल्लीत काय केलं, याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करावा लागेल.
मंत्र्यांनी जनतेमध्ये जाऊन किती सरकारी योजनांची माहिती पोहचवली, याची माहिती या रिपोर्टमधून पंतप्रधान मोदींना मिळेल.
मंत्र्यांनी मंत्रालयासोबतच प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन कामाचा कसा समतोल साधला, याचा आढावा पंतप्रधान मोदी रिपोर्टमधून घेतील.
नोटाबंदीनंतरही मोदींचे मंत्री, खासदारांना आदेश
पंतप्रधान मोदींनी भाजपच्या खासदारांना आणि मंत्र्यांना नोटाबंदी आणि डिजिटल व्यवहाराचे फायदे जनतेत प्रत्यक्षपणे जाऊन समजावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली गेली, याचा आढावा दौऱ्यांच्या रिपोर्टमधून घेतला जाईल, असा अंदाज लावला जात आहे.