नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली आहे. वेबसाईट हॅक झाल्याची माहिती मिळताच नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरच्या तज्ज्ञांनी तातडीने पावलं उचलली आणि अमर्यादित काळासाठी वेबसाईट ब्लॉक केली.


कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या हॅकिंगच्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. गेल्या महिन्यातच एनएसजी म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डची वेबसाईट हॅक झाली होती.

एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हॅकिंगची माहिती मिळाल्यानंतर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने गृहमंत्रालयाची वेबसाईट तातडीने ब्लॉक केली.

गेल्या महिन्यात पाकिस्तानशी संबंधित संशयितांनी एनएसजीची वेबसाईट हॅक केली होती आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच भारताविरोधी मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

यंदा जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या 700 हून अधिक वेबसाईट हॅक झाल्या होत्या. सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत 8 हजार 348 जणांना अटक केली आहे.