PM Modi Andhra Pradesh Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) दौऱ्यावर आहेत. आज ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंच पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अल्लुरी सीताराम राजू आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला होता. 1922 मध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या विद्रोही बंडाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.
 
कडेकोट पोलीस बंदोबस्त


अल्लुरी सीताराम राजू  यांचा जन्म 4 जुलै 1897 रोजी पंडरंगी, विजयनगरम येथे झाला होता. आदिवासी समाजासाठी अल्लुरी यांची श्रद्धा ही देवापेक्षा कमी नाही. त्यामुळं एक वर्षाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून भाजपने दक्षिणेत आपली पकड आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमावरम आणि गन्नावरममध्ये सुमारे 3000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्रीपासून भीमावरममध्ये मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी ठप्प झाली. पेदामीराम मैदानावर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे, मात्र तिथेही पावसामुळं चिखल झाला आहे.



मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी पंतप्रधानांचे स्वागत करणार 


पंतप्रधान मोदी आज हैदराबादहून विशेष विमानाने गन्नावरम येथील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी त्यांचे स्वागत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या आंध्र प्रदेश दौऱ्यासाठी भीमावरम आणि गन्नावरममध्ये सुमारे कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. भीमावरम शहरात विविध ठइकाणी 2 हजार 200 पोलीस तैनात केले आहेत. तर गन्नावरम विमानतळावर 800 कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस महासंचालक (डीजीपी) के.व्ही. राजेंद्रनाथ रेड्डी यांनी दिली. 



पंतप्रधान मोदी जाहीर सभेला संबोधित करणार 


सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर मोदी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत तसेच सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता ते विजयवाडा विमानतळावर परततील. तिथून अहमदाबादला रवाना होतील. मोदींच्या सभेसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.