नवी दिल्ली :  बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस असून, आजच्या द्विपक्षीय चर्चेनंतर उभय देशांमध्ये 22 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये आण्विक सहकार्य करारासह विविध सामरिक क्षेत्रातील करारांचा समावेश आहे.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशला विविध योजनांसाठी 4.5 अब्ज डॉलर्सचं (भारतीय चलनानुसार साडे 29 हजार कोटी) कर्ज देण्याची घोषणा केली.

याशिवाय दोन्ही देशांमध्ये रेल्वे सेवा सुरु करण्यासही हिरवा कंदील दाखवला. ही नवी रेल्वे सेवा कोलकाता आणि बांग्लादेशमधील खुलना दरम्यान जुलैपासून सुरु होणार आहे. याशिवाय कोलकाता आणि खुलना दरम्यान बस सेवा सुरु करण्यावरही दोन्ही देशांमध्ये एकमत झालं. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांमध्ये बस आणि रेल्वे सेवा सुरु झाल्यास दळणवळणाच्या माध्यमातून दोन्ही देशांना फायदा होईल.'

विशेष म्हणजे, बांग्लादेशला सैन्य पुरवठ्यासाठी 50 कोटी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. हा कर्जपुरवठा बांग्लादेशला गरजेनुसार करण्यात येणार असल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

तिस्ता पाणीवाटप प्रश्नावरील कराराच्या कार्यवाहीसंदर्भात तोडगा निघाला नाही. मात्र, हा मुद्दा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी नमुद केलं. तसेच भारत यासाठी वचनबद्ध असल्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदींनी शेख हसीना यांना दिलं. या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

या चर्चेनंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''बांग्लादेश आणि भारत यांनी एकत्रित येऊन दहशतवादाचा सामना केला पाहिजे. भारताने बांग्लादेशच्या समृद्धिसाठी नेहमीच सहकार्य केलं आहे.''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''आमच्या कंपन्या बांग्लादेशच्या कंपन्यांसोबत तेल पुरवण्याचं काम करत आहेत. यासाठी भविष्यातही आम्ही या दिशेनं अनेक सहकार्य करार करु.'' याशिवाय बांग्लादेशच्या मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा गौरव करण्यासाठी बांग्लादेशच्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान मोदींनी गौरवोद्गार काढले.

पंतप्रधान म्हणाले की, ''ऊर्जा, सायबर सुरक्षा, सिव्हील न्यूक्लिअरसह अनेक क्षेत्रांमध्ये भारत आपली भागिदारी वाढवत आहे. तसेच आर्थिक मुद्द्यांवरह भारताला बांग्लादेशसोबत काम करण्याची इच्छा आहे.'' शेख हसीना यांच्या दहशतवाद विरुद्ध सुरु केलेल्या झीरो टॉलरेंस धोरणं हे सर्वांसाठी आदर्श असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

रविवारी शेख हसीना भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यानंतर त्या अजमेर शरिफ दर्ग्यालाही भेट देतील. तर सोमवारी त्या भारतातील प्रसिद्ध उद्योजक आणि आणि दिग्गजांच्या भेटी घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्याकडे पंतप्रधानांसाठी 'मिनिस्टर इन वेटिंग' ही जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 4 दिवसीय भारत दौऱ्यावर