नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमधील ब्रिक्सच्या (BRICS) शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही औपचारिक द्विपक्षीय बैठक झाली नाही. तरीही या दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद झाला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी केलेल्या संवादाबाबतची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांकडून एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे. 


पंतप्रधानांनी दिली महत्त्वाच्या समस्यांची माहिती


भारत आणि चीनच्या सीमवेर सध्या तणावाचे वातावरण आहे. परंतु यामुळे सीमेवरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्यांकडे देखील लक्ष देणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितलं. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारत आणि चीनमधील संबंध चांगले ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता ठेवणे आणि एलएसीचा सन्मान करणं आवश्यक आहे.' 


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रध्यक्ष जिनपिंग यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्सच्या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील उपस्थित होते. भारत आणि चीनच्या सीमेवर सुरु असलेल्या तणावपूर्वक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही महत्त्वपूर्ण ठरणार होती. परंतु या दोघांमध्ये कोणताही औपचारिक भेट झाली नाही.  मात्र एलएसीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर या दोघांनी संवाद साधल्याची माहिती देण्यात येत आहे. 


याआधी इंडोनेशियामध्ये झाली होती भेट


याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये भेट झाली होती. ही देखील त्यांची अनौपचारिक भेट होती. तेव्हा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून हस्तांदोलन केलं होतं. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी कमांडर स्तरावरील 19 व्या बैठकीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये पूर्व लडाखमधील के देपसांग आणि डेमचोकमधील काही भागांमधील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. 


भारत आणि चीनच्या सीमेवर एप्रिल 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये चिनी लष्कर आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या संघार्षानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची औपचारिक बैठक झालेली नाही.


हेही वाचा : 


BRICS Summit : जेव्हा एकाच मंचावर आले पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग; ब्रिक्सच्या परिषदेमध्ये नेमकं काय घडलं?