INDIA Vs NDA: देशात 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. राजकीय पक्षांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यादरम्यान एका सर्वेक्षणात राजकारणाबाबत देशातील लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
इंडिया टुडे-सी व्होटरच्या 'मूड ऑफ द नेशन'च्या सर्वेक्षणात विचारण्यात आलं की, लोकसभा निवडणूक झाली तर विरोधकांची 'इंडिया' आघाडी मोदींचा, म्हणजेच भाजपचा पराभव करू शकेल का? केंद्रातील भाजपच्या सत्तेला पराभूत करण्याच्या उद्देशाने देशभरातील 26 पक्ष एकत्र येऊन 'इंडिया' आघाडी तयार झाली आहे, त्यामुळे सर्वेक्षणातील आकडेवारी देखील धक्कादायक आहे. या सर्वेक्षणात जनतेनं नक्की काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया...
विरोधकांची 'इंडिया' आघाडी भाजपला पराभूत करू शकते का?
होय - 33 टक्के
नाही - 54 टक्के
इंडिया टुडे-सी व्होटरच्या सर्वेक्षणातील डेटा दर्शवतो की, 54 टक्के जनतेचा असा विश्वास आहे की आज लोकसभा निवडणूक झाल्यास विरोधी आघाडी 'इंडिया' भाजपला पराभूत करू शकत नाही. त्याच वेळी, केवळ 33 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, विरोधक भाजपला पराभूत करू शकतात.
कोणाला किती मतं मिळतील?
सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये मतांची टक्केवारी आणि जागांचे आकडेही नमूद करण्यात आले आहेत, ज्यामध्ये NDA आणि विरोधी पक्षांची आघाडी 'INDIA' यांच्यात अत्यंत जिकिरीची लढत पाहायला मिळत आहे. आज निवडणूक झाली तर कोणाला किती मतं मिळणार? या प्रश्नाला उत्तर म्हणून NDA ला 43 टक्के मतं मिळू शकतात आणि 'INDIA' ला 41 टक्के मतं मिळू शकतात, असं आकडेवारी सांगते. 16 टक्के मतं इतर पक्षांच्या वाट्याला गेल्याचं दिसून आलं आहे.
कोणाला किती जागा मिळतील?
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? या प्रश्नावरील उत्तरात सर्वेक्षण आकडेवारी दर्शवते की, NDA ला जास्तीत जास्त 306 जागा मिळू शकतात, 'INDIA'ला 193 जागा आणि इतर पक्षांना 44 जागा मिळू शकतात.
जनतेचा कल जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे-सी व्होटरचं हे सर्वेक्षण 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 543 लोकसभा मतदारसंघातील 25 हजार 951 लोकांची मतं या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आली आहेत.
हेही वाचा: