कोलकाता : आतापर्यंत तुम्ही प्लास्टिकचे तांदूळ विकले जात असल्याचं ऐकलं असेल. पण आता चक्क प्लास्टिकची अंडी बाजारात आली आहेत. कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 1 लाख किमतीची प्लास्टिकची अंडी जप्त केली आहेत.


कोलकातामध्ये राहणाऱ्या अनिता कुमार यांनी एका दुकानदाराकडून अंडी खरेदी केली होती. या अंड्याचे ऑमलेट बनवत असताना अनिता कुमार यांना अंड्यांच्या दर्जाविषयी शंका आली. अंडी फुटत नसल्याने त्यांनी ती आगीजवळ नेलं असता अंड्याचा कवच जळाला. त्यामुळे अनिता कुमार यांचा संशय बळावला.

यानंतर अनिता कुमार यांनी कोलकाता पोलीसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कृत्रिम अंडी विकल्याप्रकरणी दुकानदार शामीन अन्सारीविरोधात दाखल करुन त्याला अटक केली. पोलिसांनी अन्सारीकडून तब्बल 1 लाख 15 हजारांची अंडी ताब्यात घेतली आहेत.

अन्सारीने दक्षिण भारतातून ही अंडी विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी त्या दिशेनं तपास करत आहेत. तसेच अनिता कुमार यांनी खरेदी केलेल्या अंड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ही अंडी खाऊन त्यांचा मुलगा आजारी पडत असल्याचा दावाही अनिता कुमार यांनी केला आहे.

आतापर्यंत दुधात, तुपात भेसळ झाल्याचं आपण ऐकलं होतं. पण आता प्लास्टिकची अंडी बाजारात आलीत. त्यामुळे तुम्ही अंडी खरेदी करत असाल तर ती नीट पारखून घ्या.