नवी दिल्ली : मोदी सरकारने काळ्या पैशांविरोधात सुरु केलेली मोहिन अधिकच तीव्र केली असून, आज याअंतर्गत अंमलबजावणी संचलनालय (ED) ने 300 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. ईडीच्या या कारवाईत मुंबईतल्या जगदीश पुरोहित या व्यक्तीच्या नावावर 700 बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्याचं उघड झालं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरोहितकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासोबत 46 कोटींचा व्यवहार झाल्याची नोंद मिळाली आहे.
ईडीनं आज एकूण 16 राज्यात 300 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगढ, पटणा, ओडिशा, बंगळुरु, चेन्नई, कोची आणि हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. या छापेमारीतून अनेक महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली आहेत.
नोटाबंदीच्या काळात शेकडो बोगस कंपन्यांनी काळा पैसा पांढरा करुन घेतल्याच्या संशयातून ही कारवाई झाल्याचं बोललं जातंय. महत्वाचं म्हणजे, मुंबईत ज्या व्यक्तीच्या घरावर छापा घातला गेला त्याकडे भुजबळांना पैसे दिल्याची नोंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे आधिच दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांच्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.