लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला धोबीपछाड मिळाल्यानंतर पहिल्यांदा मुलायमसिंह यादव यांनी मौन सोडलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मुलावर जोरदार हल्ला चढवला. अखिलेशवर टीका करताना मुलायम सिंह यादव यांनी, 'जो स्वत: च्या बापाचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?' असा सवाल उपस्थीत करुन जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.


मुलायम सिंह यादव यांनी यावेळी इतर नेत्यांचेही दाखले दिले. ते म्हणाले की, ''अनेक नेते आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवत नाहीत. पण मी या परंपरेला छेद देत, अखिलेशला मुख्यमंत्री केलं. अखिलेशसाठी मी इतका त्याग करुनही त्यानं मला काय दिलं? इतका अपमान आजपर्यंत माझा कुणीही केला नाही. त्यामुळे जो स्वत: च्या बापाचा होऊ शकला नाही, तो इतरांचा काय होणार?'' अशी टीका त्यांनी केली आहे.

वास्तविक, मुलायम सिंह यादव यांनी यापूर्वीही अखिलेशवर टीका केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या पराभवावर त्यांनी आज आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यातील वादात मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा आपला भाऊ शिवपाल यादव यांना साथ दिली आहे.

''शिवपाल यादव यांना पदावरुन हटवून योग्य केलं नाही. कोणी आपल्या काकाशी असं वागू शकतं का?'' असं विचारत, 'अखिलेशनं हे योग्य केलं नाही' असंही ते यावेळी म्हणाले.