नवी दिल्ली: महात्मा गांधींच्या हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही. गांधींजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका, सुप्रीम कोर्टात दाखल होती.
त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरी अर्थात न्यायालयीन मित्र अमरेंद्र शरण यांनी उत्तर दाखल करुन, गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
अमॅकस क्युरी अमरेंद्र शरण म्हणाले, “याआधीही याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाली आहे. गांधीजींच्या हत्येमागे विदेशी हात असल्याचा, दोघांनी गोळीबार केल्याचा किंवा त्यांना चार गोळ्या लागल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही”
मुंबईतील अभिनव भारतचे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
गांधीजींच्या हत्येमागे परदेशी एजन्सीचा हात असू शकतो, असा संशय डॉ. फडणीस यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या याचिकेवरुन अनेक प्रश्न विचारले होते. तसंच ज्येष्ठ अधिवक्ते अमरेंद्र शरण यांची अमॅकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती.
नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींवर जवळून गोळीबार करुन हत्या केली होती. मात्र या प्रकरणाची पूर्ण चौकशी न करता, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा डॉ. पंकज फडणीस यांनी केला आहे.
अमॅकस क्युरी म्हणजे काय?
एखाद्या क्लिष्ट प्रकरणात न्यायालय स्वत: वरिष्ठ वकील किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची नियुक्ती करते. प्रत्येक न्यायाधीशाला सर्वच विषयाची इत्यंभूत माहिती असतेच असं नसतं. त्यामुळे कोर्ट अमॅकस क्युरी अर्थात न्यायालय मित्राची नियुक्ती करते.
ही व्यक्ती संबंधित प्रकरणाच्या न्यायदानासाठी मदत करते. पण ही व्यक्ती त्या प्रकरणाशी संबंधित खटल्यामध्ये कोणत्याही अशिलाचा वकील नसते.
ही व्यक्ती संबंधित खटल्याचा अभ्यास करुन न्यायालयाला वेळोवेळी माहिती देऊन अहवाल सादर करते. त्यालाच अमॅकस क्युरी अथवा न्यायालयीन मित्र म्हणतात.