नवी दिल्ली: सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांचेच जीवन गतिमान झालं आहे. त्यातच आजच्या डिजिटल युगात मुलांचे शिक्षणही स्मार्ट व्हावे, यासाठी पालकही तितकेच सतर्क झाले आहेत. पण स्मार्ट शिक्षणाच्या हव्यासापायी चिमुरड्यांचे आयुष्य दप्तराच्या ओझ्याखाली दबून जात आहे. त्यांनाही या फास्ट लाईफच्या स्पर्धेत ओढलं जात आहे. यासंदर्भातीलच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटिझन्सनी आपली रोखठोक मते व्यक्त केली आहेत.


हैदराबादमधील सुरेन नावच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटरवरुन एक फोटो शेअर केला असून, या फोटोत शाळेतील प्रार्थनेच्या रांगेत उभ्या असलेल्या मुलाच्या खिशात पराठा दिसत आहे. सुरेनने या फोटोसोबत सर्वांना विचार करायला लावणारं मतही मांडलं आहे. सुरेनने आपल्या पोस्टमध्ये, ''खिशात सकाळचा नाश्ता, अपूरी झोप, शाळेची वेळ 10 पासून ते 5.30 पर्यंत का नाही? याचा विचार करा?'' असं लिहलं आहे. सुरेनच्या या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, सुरेनने हा फोटो पोस्ट करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनाही टॅग केला आहे.



सुरेनच्या या ट्वीटवर तेलंगणाचे मंत्री केटीरामाराव यांचे उत्तरही आले आहे. रामाराव यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ''या फोटोमुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील हे मी समजू शकतो. मुलांना त्यांचे लहानपण मनसोक्त जगू द्यावे, अशाप्रकारच्या प्रेशर कूकरच्या वातावरणात त्यांना जगू देऊ नये,'' असं म्हणलं आहे.

दरम्यान, हा फोटो कुठला आहे, याची पुष्टी अजूनही झाली नसून, सुरेनच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.