लखनऊ: महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहात असल्याच्या गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनी केला आहे. ते वाराणसीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.


उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष फुटण्याला अमर सिंह जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. त्याबाबत अमर सिंह यांनी आपली भूमिका मांडली.

कोणत्याही भांडणाचा संबंध माझ्याशीच का जोडता? अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात, त्याच्याशीही माझा संबंध जोडता का, असं म्हणत समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनी बच्चन पती-पत्नीच्या नात्याबाबत गौप्यस्फोट केला.

आपली आणि बच्चन परिवाराची ओळख होण्याआधीपासूनच एकजण प्रतीक्षा बंगल्यात तर दुसरा जनक बंगल्यात वास्तव्यास असल्याची माहितीही अमर सिंह यांनी दिली.

समाजवादी पक्षात पडलेल्या पिता-पुत्राच्या फुटीला अमरसिंह जबाबदार असल्याचा ठपका सध्या ठेवला जात आहे. त्याच आरोपांना फेटाळताना बच्चन परिवारातही आपणच फूट पाडल्याचे वृत्तही निराधार असल्याचा दावा अमर सिंह यांनी केला.

त्यामुळे बच्चन परिवाराशी एकेकाळी सलगी असलेल्या अमर सिंह यांनी बच्चन परिवारात सारं काही आलबेल नसल्याचं सांगून खळबळ उडवून दिली आहे.

अमर सिंह काय म्हणाले?

"मीडियाच्या मते, मीच अंबानी कुटुंबात भांडण लावलं. मात्र अंबानी कुटुंबातील राडा हा पैशाच्या कारणावरुन झाला.  जिथे जिथे वाद आहे, तिथे तिथे अमर सिंहचं नाव जोडलं जातं. ऐश्वर्या बच्चन आणि जया बच्चन यांनाही मीच वेगळं केलं, असा आरोप मीडियाने माझ्यावर ठेवला.

मी अमिताभ बच्चन यांना ओळखतही नव्हतो, तेव्हापासून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे वेगवेगळ्या घरात राहात होते. प्रतीक्षा आणि जनक या वेगवेगळ्या बंगल्यात दोघे राहात होते. जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना ओळखतही नव्हतो, तेव्हापासून ते वेगवेगळे राहतात. मात्र मीडियाने ते माझ्याच नावे ठोकून दिलं.

धीरुभाई अंबानींची संपत्ती मला मिळणार नाही. मात्र मीच त्यांच्या कुटुंबात महाभारत घडवून आणल्याचं दाखवलं जात आहे. बच्चन कुटुंबात, समाजवादी पक्षात सगळीकडे मीच भांडणं लावली, असं मीडियाचं म्हणणं आहे", असं अमर सिंह म्हणाले.