नवी दिल्ली : महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्ती आणि प्रमोशनसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पदोन्नतीसाठी आता पीएचडीही सक्तीची करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी याबाबत माहिती दिली आहे.


आतापर्यंत महाविद्यालयीन प्राध्यापक होण्यासाठी पदवी परीक्षेसह नेट, सेट किंवा पीएचडी करणं बंधनकारक होतं. मात्र या नियमात बदल करत पीएचडी बंधनकारक करण्यात आली आहे, म्हणजेच फक्त नेट किंवा सेटच्या पात्रतेवर आता महाविद्यालयीन प्राध्यापकांची नियुक्ती होणार नाही. 2021 पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आल्याचं प्रकाश जावडेकरांनी म्हटलं आहे. तसंच महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नतीसाठीही पीएचडी बंधनकारक असेल. विद्यापीठांतील नव्या नियुक्त्या पीएचडीधारकांनाच दिल्या जाणार आहेत. ज्या प्राध्यापकांकडे सध्या पीएचडी नाही, त्यांना तीन वर्षांचा वेळही देण्यात आला आहे. 2021 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर असलेल्या सर्व प्राध्यापकांना पीएचडी मिळवणं बंधनकारक आहे.

दरम्यान ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाबाहेरील 500 सर्वोत्तम विद्यापीठांतून पीएचडी मिळवली आहे. ते विद्यार्थी भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र असतील.