नवी दिल्ली : दलित या शब्दाचा वापर मीडियाने टाळावा, अशी सूचना भारतीय प्रेस परिषद (पीसीआय) काढण्याच्या तयारीत आहे. तशा सूचना देण्यास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं होतं.
दलित या शब्दाचा वापर टाळण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. दलित या शब्दाऐवजी 'अनुसूचित जातीमधील व्यक्ती' असा उल्लेख करण्याचा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना 15 मार्चला दिला होता.
एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गेल्या आठवड्यात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मीडियातून दलित या शब्दाचा वापर वगळण्याचा विचार बोलून दाखवला होता.
कोर्टाच्या आदेशाचा विचार करत भारतीय प्रेस परिषदेनेही तशी सूचनावली जारी करावी, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालय सुचवणार आहे.