पणजी : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीज या बंद आस्थापनावर, तसेच पर्रा-हडफडे येथील घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी पथकाने तीन विदेशी नागरिकांसह एका पंजाबी युवकाला अटक केली; मात्र मुख्य सूत्रधार कळंगुट येथील हॉटेलातून पसार होण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या संशयितांसाठी पथकाने पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेतला असून (आज) गुरुवारी सकाळी ते मुंबईत दाखल होणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पथकाने जोनाथन थोर्न (वय 44 वर्ष), बॅरी जॉन (वय 67 वर्ष) या दोन ब्रिटीश नागरिकांसह व्हिएतनाम येथील न्युयन मॅन कुयोंग (वय 30 वर्ष) आणि पंजाब येथील सरप्रीत सिंह (वय 45 वर्ष) यांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार जिमी सिंह हा अमली पदार्थ व्यवहारात गुंतल्याची माहिती प्राप्त झाली होती.

यात आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असून गोव्यातून अमली पदार्थांची मुंबई तसेच विदेशांत तस्करी होत असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यावरुन गोव्यात अमली पदार्थ तयार करण्याची प्रयोगशाळा कार्यरत असण्याचा संशय पथकाला आला होता. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या अधिका‌ऱ्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये 15 दिवस गोव्यातील ओद्योगिक वसाहत आणि किनारीभागात रेकी केली होती. परंतु त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं.

गेल्या आठवड्यात पथकाने मुंबई येथील एका आस्थापनात छापा टाकल्यानंतर त्यांना गोव्यातील पिसुर्ले औद्योगिक वसाहतीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने पिसुर्ले वसाहतीत शनिवारपासून पाळत ठेवली होती. सोमवारी त्यांना वसाहतीतील बंद असलेल्या विजय इंडस्ट्रीच्या शेडमध्ये संशयास्पद व्यवहार सुरु असल्याचे आढळून आले. पथकाने सोमवारी छापा टाकून सरप्रीत सिंह याच्यासह तीन कामगारांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्या ठिकाणावरुन पथकाने 53 किलो केटामाईन जप्त केले. तसेच 200 लिटरचे पाच बॅरेल असे एकूण 1000 लिटर ऑर्थोडिक्टोबॅनझायन, 25 लिटरचे 34 छोटे कॅन अॅसिटोन, काही प्रमाणात मिथॅनोल आणि कोळसा असा कच्चा माल जप्त केला.

पिसुर्ले वसाहतीतील प्रयोगशाळेत सरप्रीत सिंहला मदत करणारा न्युयन मॅन कुयोंग याला कळंगुट येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. मात्र यावेळी मुख्य सूत्रधार जिमी सिंह पसार झाला.

दरम्यान, केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने पर्रा-हडफडे येथील एका घरावर छापा टाकला आणि बॅरी जॉन आणि जोनाथन थोर्न या ब्रिटीश नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. पथकाने त्या घरातून 7.5 किलो हशीष, 600 ग्रॅम केटामाईन, 1.5 किलो अफू हे अमलीपदार्थ जप्त केले. यावेळी आणखी 5 किलो माल जप्त करण्यात आला असून ते ड्रग्ज आहे का याची अद्याप चाचणी झालेली नाही.