पाटणा : बलात्कार पीडित 10 वर्षीय चिमुरडीच्या गर्भपाताला अखेर मंजुरी मिळाली आहे. सावत्र पित्याने केलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या बालिकेच्या गर्भपाताला डॉक्टरांनी मंजुरी दिली आहे. स्थानिक कोर्टाने रोहतक पीजीआयमधील वैद्यकीय मंडळाला या प्रकरणी निकाल देण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं.


या प्रकरणातील अहवाल पूर्णपणे गोपनीय असून तो फक्त पोलिसांसमोरच उघड केला जाईल, असं मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर अशोक कुमार यांनी स्पष्ट केलं होतं. गर्भपाताच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बालकल्याण समितीने तिचं समुपदेशन करुन तिला दहशतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

गर्भपात कायद्याअंतर्गत चिमुरडीचा गर्भपात शक्य असेल, तर गर्भपाताला मंजुरी द्यावी, असं स्थानिक कोर्टाने सांगितलं होतं. मात्र दोनच दिवसांपूर्वी वैद्यकीय मंडळाने कोर्टात दिलेल्या अहवालानुसार गर्भपात किंवा डिलीव्हरी, दोन्हीही शक्यतांमध्ये बालिकेच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. पीडितेच्या आईनेच कोर्टात गर्भपाताची परवानगी मागितली होती.

10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी आरोपी सावत्र पिता न्यायालयीन कोठडीत आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचं तिच्या दीराशी लग्न करण्यात आलं. मात्र त्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीवर अत्याचार केले.

पीडित बालिका प्रेग्नंट झाल्यानंतर, 10 मे रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. त्यावेळी पीडिता पाच महिन्यांची गरोदर होती.

कायदेशीररित्या 20 आठवड्यांच्या आधी गर्भपात करण्यास मंजुरी आहे. गर्भामुळे आईला मानसिक आणि शारीरिक त्रास होण्याची शक्यता असल्यास गर्भपाताची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जन्मानंतर मूल मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असण्याची शक्यता असल्यास गर्भपाताची तरतूद करण्यात आली आहे.