नवी दिल्ली : पीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्याबाबत कामगार मंत्रालयाने काही नियम शिथील केले आहेत. पीएफ खातेधारक घरखरेदी, वैद्यकीय उपचार, विवाह किंवा मुलांचं शिक्षण सारख्या काही कारणांसाठी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकतात.


 
खातेधारक स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मोठ्या वैद्यकीय उपचारांसाठी, मुलांच्या मेडिकल, डेंटल किंवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या आणि मुलांच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. 1 ऑगस्टपासून हा नवा निर्णय लागू होणार आहे.

 
पीएफ खातेधारकांना या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमानुसार (30 एप्रिलपर्यंत लागू असलेला नियम) कुठलीही व्यक्ती नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांच्या अंतराने पीएफमधील संपूर्ण रक्कम काढू शकत असे. त्याचप्रमाणे नोकरीत असतानाही 54 व्या वर्षी रक्कम काढण्याची तरतूद होती.

 

पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे.