रायपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. भविष्यात पेट्रोल 55 आणि डिझेल 50 रुपये प्रतिलीटर दराने मिळेल असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काल काँग्रेसने भारत बंद केला होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीवर बोलताना सामान्य नागरिकांना दिलासा दिला. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल तयार करण्यासाठी देशात पाच प्लांट सुरु करणार आहे. लाकडी वस्तू आणि कचऱ्यापासून इथेनॉल बनवले जाईल. यामुळे डिझेल 50 रूपये तर पेट्रोल 55 रुपये प्रतिलीटर दराने मिळू शकेल,  असा दावा गडकरी यांनी दिली.


तेल आयात विषयी बोलताना गडकरी म्हणाले, "केंद्र सरकार जवळपास आठ लाख कोटी रुपयांचं डिझेल आणि पेट्रोल आयात करतं. पेट्रोलची किंमत वाढत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्यही कमी होत आहे. त्यामुळे इंधनदरवाढ मोठी समस्या बनली आहे. इंधनाला पर्याय म्हणून नव्या टेक्नॉलॉजीनुसार इथेनॉलपासून गाड्यादेखील चालवणं शक्य होऊ शकतं."


इंधन दरवाढीच्या विरोधात काल (10 सप्टेंबर) काँग्रेससह विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. सरकारनं तात्काळ पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. काँग्रेसच्या भारत बंदला देशभरातील 21 पक्षांनी पाठिंबा दिला