हैदराबाद : आंध्र प्रदेशची तत्कालीन राजधानी हैदराबादमधील दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोन दहशतवाद्यांना फाशी आणि एकाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हैदराबादमधील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

शहरात 25 ऑगस्ट 2007 रोजी प्रसिद्ध रेस्टॉरंट गोकुळ चाट आणि लुम्बिनी पार्क येथील एका ओपन एअर थिएटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला होता, तर 68 जण जखमी झाले होते.

या अकरा वर्षे जुन्या प्रकरणात चार सप्टेंबर रोजी अनीफ शफीक सैयद आणि मोहम्मद अकबर इस्माईल चौधरी यांना दोषी ठरवलं होतं. हैदराबादमधील द्वितीय अतिरिक्त मेट्रोपॉलिटन सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (प्रभारी) टी श्रीनिवास राव यांनी हा निर्णय दिला होता. सबळ पुराव्यांअभावी फारुख शरफुद्दीन तर्कश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शैक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

न्यायालयाने या प्रकरणातील पाचवा आरोपी तारिक अंजुमला सोमवारी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या आरोपपत्रात उल्लेख असलेले आणखी तीन कुख्यात दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ, त्याचा भाऊ इकबाल आणि आमिर रजा फरार आहेत. मूळचे कर्नाटकचे असलेले भटकळ बंधू पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत असल्याचं बोललं जातं.