नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या एक नवी योजना तयार करत आहे. याद्वारे सरकार तुमच्या गाड्या मिथेनॉलवर चालवण्याच्या विचारात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुण्यामध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे या चाचण्या निती आयोगाच्या देखरेखीखाली होत आहेत.

कशा होतात चाचण्या?
वाहनांमधील पेट्रोलमध्ये 15 टक्कयांपर्यंत मिथेनॉल मिसळून ते वापरण्यात येत आहे. पुण्यात या चाचण्या सुरु आहेत. गाड्यांचा वेग, निर्माण होणारे प्रदूषण, इंजिन आणि इंधनाची क्षमता यांचा अभ्यास केला जात आहे. पेट्रोलमध्ये जर 15 टक्के मिथेनॉल मिसळले तर पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी होतील. मिथेनॉल हे कोळशापासून तयार केले जाते.

सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉल हे उसापासून तयार केले जाते. इथेनॉलची किंमत प्रति लीटर 42 रुपये इतकी आहे. तर कोळशापासून तयार होणाऱ्या मिथेनॉलची किंमत 20 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

पुण्यात याच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील दोन महिन्यांमध्ये याच्या विविध चाचण्या पूर्ण होऊन अहवाल समोर येईल. त्यानंतरच पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिथेनॉल मिसळून ते विकले जाईल. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर आठ ते दहा रुपयानी कमी होणे अपेक्षित आहे.