नवी दिल्ली : आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार दररोज पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र या निर्णयाला ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स’ने विरोध दर्शवला आहे.


येत्या 16 ते 24 जून या कालावधीत देशातील सर्व पंपांवर पेट्रोल व डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला डीलर्सच्या संघटनेनं घेतला आहे. या आंदोलनानंतरही केंद्राने निर्णय मागे न घेतल्यास 24 जूननंतर बेमुदत बंदचा इशाराही दिला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं तीनही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी स्वागत केलं होतं. मात्र डीलर्स असोसिएशननं या निर्णयाला विरोध केला आहे.

काय आहे प्रकरण?

पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा करत देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला होता. तीन सरकारी तेल कंपन्यांनी या आपल्या जुन्या मागणीवर शिक्कामोर्तब केलं.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार!

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला.  इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी, दरातील चढ-उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे. 1 मे पासून उदयपूर, जमशेदपूर, पद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे, ज्याची आता देशभरात अंमलबजावणी केली जाईल.

अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर दररोज ठरवण्याची व्यवस्था अगोदरपासूनच सुरु आहे. ग्राहकांना नियमित दर समजावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दररोज वृत्तपत्रांमध्ये दर प्रकाशित केल जातील. मोबाईल अॅप, मेसेजेसद्वारे आणि पेट्रोल पंपांवर प्रभावीपणे दर प्रदर्शित केले जातील, असं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे.