नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे आधीच दैनंदिन व्यवहार कोलमडलेल्या देशातील नागरिकांना आता आणखी एका समस्येला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. आगामी तीन ते चार महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
क्रिसिलने (क्रिसिल म्हणजे क्रेडिट रेटिंग इन्फर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आगामी तीन ते चार महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 5 ते 8 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 6 ते 8 टक्के वाढ होईल. कारण गेल्या आठवड्यात तेल उत्पादक देशांची संघटना म्हणजेच ओपेकने कच्चा तेलाच्या उत्पादनावर दररोज 12 लाख बॅरेलची (MPBD) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिसिलच्या रिपोर्टनुसार, "ओपेकच्या नव्या निर्णयामुळे कच्चा तेलाच्या किंमती मार्च 2017 पर्यंत वाढून 50 ते 55 डॉलर प्रति बॅरेल होण्याची शक्यता आहे. आणि जर ही वाढ 60 डॉलर प्रति बॅरल झाली, तर पेट्रोलची किंमत 80 रुपये आणि डिझेलची किंमत 68 रुपये होण्याची शक्यता आहे. मात्र, आता ओपेकच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर पुढील सर्व गोष्टी अवलंबून असतील."
"नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचा खपही कमी झाला आहे. मात्र, जेव्हा पुन्हा मुबलक चलन बाजारात येईल, तेव्हा पुन्हा पेट्रोल-डिझेलची मागणी वाढेल." असं निरीक्षणही क्रिसिलच्या रिपोर्टमध्ये नोंदवले आहे.