Petrol and Diesel Price in India Latest Updates : पेट्रोलच्या किमतींमध्ये सलग 21 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशातच डिझेलच्या दरांत मात्र पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL)नं दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच, 26 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किमतींमध्ये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या राजधानीत आज पेट्रोलची किंमत 101.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर डिझेलची किंमत 25 पैशांनी वाढून 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. 

पेट्रोलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी 1 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर म्हणजेच, आतापर्यंत दोन वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel)च्या दरांत 15-15 पैसे प्रति लिटरची घट केली होती. सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेल 30 पैशांनी स्वस्त झालं होतं. परंतु, त्यानंतर इंधनाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आली नव्हती. 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किमती देशभरात 20 ते 22 पैशांनी वाढवण्यात आल्या होत्या. तसेच त्यानंतर ठिक 3 दिवसांनी पुन्हा एकदा 25 ते 27 पैशांची वाढ करण्यात आली आहे. 

मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील दर 

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL)नं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलची किंमत 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 96.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर चेन्नईत पेट्रोलची किंमत 103.79 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 95.10 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

देशांतील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली 101.19 89.07
मुंबई 107.26 96.68
चेन्नई 103.79 95.10
भोपाळ 109.63 97.92
रांची  96.21 94.05
जम्मू  100.53 89.71

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 

सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे. 

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).