नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाची झळ आता जगभरातील तसेच भारतातील सर्वसामान्य लोकांना बसण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत गेल्या काही काळापासून वाढवल्या नव्हत्या. आज उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे आता आपला तोटा भरून काढण्यासाठी तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करणार हे स्पष्ट झालंय. ही दरवाढ आज होणार की उद्या याबाबतची  केवळ औपचारिकता बाकी आहे. 


वाढ एकदम होणार की हळूहळू?
सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 10 ते 12 रुपये दर वाढ होणार हे नक्की. पण, दर एकाच वेळी वाढवणार का दररोज 2 ते 3 रुपयानी वाढणार हे सांगता येणार नाही. ते निर्णय कंपनी घेतील अशी प्रतिक्रिया फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे आता स्पष्ट झालंय.


पेट्रोलची किंमत आज वाढणार की उद्या?
पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे देशातील तेल उत्पादक कंपन्यांवर तेलाच्या किंमती न वाढवण्याचा दबाव होता. त्यामुळे तेल उत्पादक कंपन्यांना 23 ते 25 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्य्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 ते 12 रुपयांनी वाढणार हे नक्की आहे. ही किंमतवाढ आता आज संध्याकाळी जाहीर होणार की उद्या याची औपचारिकता बाकी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.


कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये उच्चांकी वाढ
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी 2008 नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळी गाठली आहे. ब्रेंट क्रूडचे दर 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर 147 डॉलर प्रति बॅरल रेकॉर्ड स्तर गाठला आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत.


गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे. आज या निवडणुकांची सांगता होत असून त्याचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.


संबंधित बातम्या :