मुंबई: समस्त जनसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी (Petrol Diesel Price) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरून 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
यंदाच्या तिमाहीत तिन्ही सरकारी कंपन्यांना मिळून 28 हजार कोटींचा नफा झाला आहे. गेल्या तीन तिमाहींचा विचार केला तर हा नफा एक लाख कोटींच्या घरात आहे. आणखी एक मोठं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारांत तेलाचे दर 75 डॉलर प्रति बॅरेलपेक्षाही कमी झालेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या एप्रिल आणि मेमध्ये लोकसभा निवडणुका आहे. त्या अनुषंगानं देखील केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या 589 दिवसांपासून स्थिर आहेत. त्यांच्या किमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये दिसून आला. आता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही किंमत 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
रशियासोबतच्या व्यापाराने मोठा फायदा
ज्यावेळी रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळी अनेक देशांनी रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करण्यावर अमेरिकेने बंदी घातली होती. त्यावेळी भारतावरही मोठा दबाव होता. पण तरीही भारताने रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी सुरूच ठेवली. त्याचा फायदा भारताला झाला. त्यानंतरही भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात आल्या नव्हत्या.
दरम्यानच्या काळात पेट्रोलियम कंपन्यांना त्यांचा तोटा भरून काढण्यास मदत झाली. आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या सात ते आठ रुपयांनी कमी झाल्या तरी त्यामध्ये समतोलता राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची चिन्हं आहेत.
सध्या भारताचे परराष्ट्रमंत्री हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. भारत आणि रशियाच्या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये भारताने क्रूड ऑईलच्या किमतीच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
ही बातमी वाचा: