Price Rise Pinch : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे लोकं आता मेटाकुटीला आल्याचे पहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींनी भडका उडाला असताना आता सीएनजी-पीएनजीच्या (CNG - PNG) किंमतीही वाढू लागल्या आहेत. खाण्याच्या तेलापासून (vegetable, Oil) ते कडधान्यांपर्यंत ते महाग झाले आहे. आता भाज्या आणि फळेही (Vegetables - Fruits) महागली आहेत. अशा परिस्थितीत या दिवाळीत महागाईमुळे दिवाळं निघू नये, अशी काळजी लोकांना वाटतेय.


दिवाळी महागाईचा भडका
धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठ हे सण उबरठ्यावर आहेत. या सणांमध्ये प्रत्येक वस्तूचा खप वाढतो. यावेळी देखील सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अवकाळी पावसामुळे फळे आणि भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत, त्यामुळे महागाईच्या काळात या गोष्टींच्या किंमती आणखी वाढू शकतात असा विश्वास आहे. तर महागडे पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीमुळे मालवाहतूकही महाग झाली आहे. त्यामुळे महागाई वाढणे निश्चित मानले जात आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर मागील काही महिन्यांच्या तुलनेत कमी असला तरी ऑक्टोबरमध्ये त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.


इंधन अधिक महाग होणार
केवळ ऑक्टोबर महिन्यातच पेट्रोल 5.60 रुपयांनी तर डिझेल 6.10 रुपयांनी महागले आहे. ऑक्टोबर महिन्यातच सीएनजी 4.56 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 4.20 रुपये प्रति युनिटने महागला आहे. या सर्व पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कच्चे तेल अधिक महाग होऊ शकते, तर नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढत आहेत.


पावसामुळे फळे आणि भाज्या महागल्या
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमधील किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमधील 4.35 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. त्यांच्या मते, जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये दर महिन्याला वाढ दिसून येत आहे. खरं तर, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. याच्या मागे, देशातील अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिवृष्टीमुळे खराब झालेले पीक जबाबदार असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्चातही वाढ होत असल्याने दरही वाढत आहेत.


खाद्यतेलातूनही सूट नाही
मोहरीच्या तेलाचा भाव 200 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याचे सरकारचे प्रयत्नही अपुरे ठरत आहेत. सरकारने अलीकडेच खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले होते, पण खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एका अंदाजानुसार, देशातील खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी 54 टक्क्यांहून अधिक तेल आयात केले जाते.
सध्या जगभरात वाढत्या वापरामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्वयंपाकाचे तेल 60 टक्क्यांहून अधिक महाग झाले आहे. केवळ सप्टेंबर महिन्यात खाद्यतेल 30 टक्क्यांनी महाग झाले आहे. येत्या काही महिन्यांत सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने मागणी वाढल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून सुटका मिळण्याची आशा फारच कमी आहे.