कोलकाता : आधी राजस्थान, नंतर आंध्र प्रदेश आणि आता पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपयाची कपात करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.


राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल-डिझेलवरील वॅट चार टक्क्यांनी कमी केला, ज्यामुळे दर अडीच रुपये प्रति लिटर एवढे कमी झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायुडू यांनीही आंध्रवासियांना दिलासा देत पेट्रोल-डिझेल दोन रुपये प्रति लिटरने स्वस्त केलं. आता पश्चिम बंगाल सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे राज्य सरकार नागरिकांना दिलासा कधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून एक्साईज ड्युटी, तर राज्य सरकारकडून वॅट वसूल केला जातो. वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा देणं राज्य सरकारच्या हातात असतं, तर एक्साईज ड्युटी कमी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही सुरुच आहे. आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रति लिटर आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलची वेगाने शंभरीकडे कूच सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा संतापाचा पाराही त्याच वेगाने चढत आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल तब्बल 2 रुपये 17 पैशांनी महागलं आहे.

संबंधित बातम्या :
पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ

...तर पेट्रोल 55, डिझेल 50 रुपये प्रतिलीटरने मिळेल- गडकरी