अहमदाबाद: देशात सातत्याने इंधनाच्या किंमती वाढत आहेत. काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की आता यावर बोलणं म्हणजे धर्मसंकट आहे.


गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्याचा परिणाम थेट देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे. देशातल्या काही भागात पेट्रोलच्या किंमती शंभरी पार करण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या मते या किंमती ठरवणे हे त्यांच्या हातात नाही, इंधनाच्या किंमती या तेल कंपन्या ठरवतात.


इंधनाच्या वाढत्या किंमतीवर अहमदाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "या किंमती कधी कमी होणार त्यावर आताच काही सांगू शकत नाही. आता यावर काही भाष्य करणे म्हणजे धर्मसंकट आहे."


Petrol and Diesel price| इंधनाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास


पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार जो भरमसाठ कर लावतो तो कधी कमी करणार या प्रश्नाला उत्तर देताना 'या प्रश्नाने धर्म संकटात टाकलंय' असं उत्तर निर्मला सीतारमण यांनी दिलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं.


त्या आधी देशातल्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर भाष्य करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं होतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी करावेत. केंद्राने आणि राज्याने यावर एकत्र बसून तोडगा काढावा असाही सल्ला त्यांनी दिला आहे.


सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.


Petrol and Diesel price : सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावा, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा सल्ला