तब्बल 10 सरकारी तपास यंत्रणांना आयटी अॅक्टच्या कलम-69 अतंर्गत कम्प्यूटर-मोबाईलमधील माहिती तपासायचा अधिकार देण्यात आला आहे. तुमच्या संगणक, मोबाईलमधला डाटा तपासायचा अधिकार सरकारला मिळणार आहे. या निर्णयाला तपास यंत्रणांना विरोध केला तर थेट 7 वर्षांच्या कारावासाची तरतुदही करण्यात आली आहे.
भाजप सरकारनं लोकांच्या खाजगी आयुष्यात लुडबूड केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कॉम्प्युटर डेटावर पाळत ठेवण्यासंबंधीचा आदेश देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.
विरोधकांच्या हल्ल्यानंतर 'हा यूपीए सरकारच्या काळातील आदेश आहे,' असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यावर राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशावर 'पोलीस राज' लादलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'असुरक्षित हुकूमशहा' आहेत, असं ते म्हणाले. तर घर घर मोदी या घोषणेचा खरा अर्थ म्हणजेच हा निर्णय आहे, अशा शब्दात एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी सरकारवर निशाणा साधला आहे.
या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. मोदी सरकारला लोकांच्या खासगी गोष्टींवर अतिक्रमण करायचे होते हेच हा निर्णय दाखवतो अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. राईट टू प्रायव्हसीचा हा भंग आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
कोणकोणत्या सरकारी यंत्रणा आपल्यावर लक्ष ठेवणार?
आय बी
सी बी आय
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
सक्त वसुली संचलनालय
राष्ट्रीय तपास यंत्रणा
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्त टॅक्सेस
डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स
कॅबिनेट सेक्रेटेरिएट
डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजेन्स
दिल्ली पोलीस आयुक्तालय