अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या एका रोड अपघातामुळे तेथील दारुबंदीची पोलखोल झाली आहे. काल (रविवार) अहमदाबाद-बडोदा एक्सप्रेस वेवर मर्सडिज आणि सेलेरियो कारचा जोरदार अपघात झाला. या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पण यावेळी सेलेरिओ गाडीत ठेवलेल्या बीअरच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर जमा झाला.
बीअरच्या बाटल्या भररस्त्यात पाहून यावेळी इथं उपस्थित असलेल्या अनेकांनी त्या गाडीच्या दिशेनं धाव घेतली. त्यानंतर प्रत्येकानं या बाटल्या पळवण्यास सुरुवात केली. अशी लूट सुरु असताना तिथेच उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीनं हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात शूट केला. त्यानंतर या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
दरम्यान, गुजरातमध्ये पूर्णत: दारुबंदी आहे. दारुचा साठा करणं किंवा दारु पिणं हा गुजरातमध्ये गुन्हा आहे. पण ही बंदी लागू असताना देखील अशा पद्धतीनं दारुच्या बाटल्या समोर येत आहे. त्यामुळे गुजरातमधील दारुबंदी किती फोल ठरत आहे हे पुन्हा दिसून आलं आहे.