मुंबई: 'देशभरात बँका आणि एटीएमबाहेर भल्या मोठा रांगा लागल्या आहेत. याच रांगामध्ये तब्बल 18 ते 20 जणांचा मृत्यू झालेला असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी मात्र यावेळी हसत आहेत.' अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
मोदींचे जपान आणि गोव्यातील भाषणांकडे इशारा करत राहुल गांधी म्हणाले की, 'जवळजवळ 18 ते 20 लोकांचा रांगेत मृत्यू झाला आणि पंतप्रधान मोदी हसत होते. त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की, ते हसत होते की, रडत होते?'
राहुल गांधींनी यावेळी नोटाबंदींवरुन देखील मोदींवर निशाणा साधला. 'नोटाबंदीच्या निर्णयाबाबत मोदींनी भाजपच्या लोकांना आधीच सूचित केलं होतं. त्यामुळे मोदी सरकारचं हा निर्णय सर्वात मोठा घोटाळा आहे.'
राहुल गांधींनी असाही दावा केला की, 'अर्थमंत्री अरुण जेटलींना देखील या घोषणेबाबत सांगण्यात आलं नव्हतं. मला वाटत नाही की, अर्थमंत्र्यांना या निर्णयाबाबत माहिती होती.'