नवी दिल्ली : एका व्यक्तीला अकाऊंटशिवाय फक्त साडेचार हजाराच्या नोटा बदलून मिळतील. त्यापेक्षा जास्त रकमेच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून मिळणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

विशेष म्हणजे साडेचार हजार रुपयांची रक्कम केवळ एकदाच बदलून मिळणार आहे. त्यानंतर साडेचार हजार रुपयांवरील रक्कम बँक खात्यात जमा करावी लागेल. मात्र, बँक खात्यातील रक्कम क्रेडिट कार्ड, चेक, एटीएम किंवा इतर कॅशलेस ट्रॅन्झॅक्शनद्वारे वापरु शकता.

तुम्हाला साडेचार हजारापेक्षा जास्त नोटा बदलायच्या असतील, तर तुम्ही त्या तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करु शकता. ज्यांच्याकडे बँक अकाऊंट नसेल, त्यांना बँकेत अकाऊंट उघडावं लागणार आहे. त्यानंतर साडेचार हजार रुपयांवरील रक्कम जमा करता येईल.

उदाहरणार्थ - समजा, तुमच्याकडे 10 हजार रुपये आहेत. त्यामध्ये सर्व नोटा पाचशे आणि हजाराच्या आहेत. त्या तुम्हाला बदलायच्या असतील, तर नव्या नियमाप्रमाणे त्यापैकी साडेचार हजार रुपयेच बदलता येतील. उर्वरीत पैसे तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटवर भरून, ते पैसे एटीएम किंवा थेट बँकेतून स्लिप भरून काढता येतील.

मोदींचा निर्णय

 

काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.