चेन्नई : 'द हिंदू' या वृत्तपत्र समुहाचे संचालक आणि माजी मुख्य संपादक एन. राम आणि एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझमचे चेअरमन शशी कुमार यांनी पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजी किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी एका याचिकेच्या माध्यमातून केली आहे. 


पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून सरकारवर देशातील 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, सरकारने या स्पायवेअरचा वापर कसा केला आहे याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करावी अशी मागणी एन. राम आणि शशी कुमार यांनी केली आहे. 


पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील ज्या 40 लोकांवर पाळत ठेवण्यात आली आहे त्यामध्ये 'द हिंदू' चे माजी मुख्य संपादक आणि सध्याचे संचालक एन. राम यांचा समावेश असल्याचं फ्रान्सच्या मीडियाने स्पष्ट केलं आहे. 


या स्पायवेअरचा वापर करण्याचा अधिकार कोणत्या सरकारी यंत्रणेला देण्यात आला होता आणि त्या माध्यमातून देशातील कोणत्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली याचा तपास करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशीही मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 


पेगॅसस स्पायवेअर हे केवळ जगभरातील सरकारांना विकण्यात आलं असल्याचं इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने वारंवार स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतात याचा वापर केवळ भारत सरकारने केला असल्याचं स्पष्ट होतंय असा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला आहे. 


इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते आणि प्रमुख व्यक्ती यांच्यावर केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप 16 माध्यम समूहांनी एका मालिकेतून केला आहे. त्यानंतर देशात राजकीय रणकंदन सुरु झालं असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये यावरुन हंगामा झाल्याचं दिसून आलं. 


दोन वर्षांपूर्वी, 2019 साली हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅपने भारतातील काही पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एक मेसेज करुन त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरने हेरगिरी केल्याचं सांगितलं होतं. या स्पायवेअरच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये हेरगिरी होत असल्याचं आणि गोपनीय डेटा चोरी होत असल्याची जराही कल्पना येत नाही इतकं ते गुप्तपणे काम करतं. त्यामुळे जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी आपल्या देशातील पत्रकार आणि विरोधात बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायलच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. 


संबंधित बातम्या :