नवी दिल्ली : जेएनयूमध्ये 2016 मधील कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी तीन वर्षांनंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी प्रमुख कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्यासह दहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.


या सर्वांवर तब्बल 1200 पानाचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रामध्ये 36 जण असेही आहेत की ज्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठीचे पुरेसे पुरावे देखील नाहीत. कन्हैया कुमार, उमर खालिद, अर्निबान भट्टाचार्य यांच्यासह सात काश्मिरी विद्यार्थ्यांचीही या आरोपपत्रात नावे आहेत.


आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, राईए रसूल, बशीर भट आणि बशरत अशी काश्मिरी युवकांची नावं आहेत. या सर्वांवर 124A, 323, 465, 471, 143, 149, 147, 120B या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. जवळपास तीन वर्षांनंतर याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालं आहे. फॉरेन्सिक आणि फेसबुक डेटाच्या माध्यमातूनही पुरावे गोळा करण्यात आले आहेत.


प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी अनेक राज्यांचे दौरे करावे लागले. आता प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिली.


काय आहे प्रकरण?


संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरुच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 9 फेब्रुवारी 2016 ला करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भारत तेरे टुकड़े होंगे..., कश्मीर की आजादी तक जंग रहेगी... अशा राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर आहे.