अमित शाह यांच्याकडून एनडीएच्या सर्व खासदारांना पार्टी
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2017 05:54 PM (IST)
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून एनडीएमधील सर्व पक्षांच्या खासदारांना स्नेहभोजन देण्यात येणार आहे. येत्या 10 एप्रिल रोजी अमित शाह यांनी या स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाचा दारुण परभाव केला. पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा या निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शिवाय, भाजपने सर्व राजकीय अंदाज मोडत विक्रमी मतं जागा जिंकत उत्तर प्रदेशात सत्ता मिळवली. त्यानंतर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उत्तर प्रदेशातील भाजपच्या या विजयाचं सेलिब्रेशन म्हणूनही या स्नेहभोजनाकडे पाहिलं जात आहे. येत्या जूनमध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. त्यावेळी राष्ट्रपतीपदासाठी कुणाचं नाव पुढं केलं जाईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला एनडीएतील मित्रपक्षांची गरज भासणार आहे. या चर्चांचाही स्पर्श अमित शाह यांच्या स्नेहभोजनाला आहे.