नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निशाणा साधला. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानात दिलेल्या अपमानास्पद वागणुकीप्रकरणी सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन केलं.


राज्यसभेतील निवेदतानात सुषमा स्वराज म्हणाल्या की, "सरकारने कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं. यानंतर फाशीची शिक्षा टाळली. कठीण प्रसंगात सरकार कुटुंबासोबत आहे. आम्ही कुटुंबातील सदस्यांची कुलभूषण जाधव यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली."

आई-पत्नीला विधवेप्रमाणे कुलभूषण यांच्यासमोर नेलं!

"पण या भेटीत पाकिस्तानने दिलेली वागणूक हा खेदाचा विषय आहे. पाकिस्तानने हा प्रचाराचा मुद्दा बनवला. जाधव यांची आई फक्त साडी नेसते, त्यांचेही कपड बदलण्यात आले. त्यांना साडीऐवजी सलवार-कुर्ता परिधान करण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर त्यांची टिकली आणि मंगळसूत्रही काढायला लावलं. याबाबत मी कुलभूषण जाधव यांच्या आईशी चर्चा केली. आईला पाहिल्यानतंर कुलभूषण यांनी पहिला प्रश्न विचारला की, बाबा कसे आहेत? त्यांच्या अनुपस्थितीत कोणती अशुभ घटना तर घडली नाही ना, असं कुलभूषण यांना वाटलं. आई आणि पत्नी या दोन्ही सौभाग्यवतींना पाकिस्तानने विधवेप्रमाणे कुलभूषण यांच्यासमोर नेलं," असं सुषमा स्वराज म्हणाले.

मराठीत संवाद साधल्याने इंटरकॉम बंद केलं
सुषमा स्वराज म्हणाल्या की, "कुलभूषण जाधव यांच्या आईला त्यांच्याशी मराठीत बोलायचं होतं. आई-मुलाला मातृभाषेतच संवाद साधणं सोयीस्कर असतं. पण त्यांना परवानगी दिली नाही. मराठीत संभाषण सुरु असताना पाकिस्तानच्या दोन महिला अधिकारी सातत्याने विरोध करत होत्या. त्या मराठीतच बोलत असल्याचं पाहून अधिकाऱ्यांनी आईचा इंटरकॉम बंद केला, जेणेकरुन ते बोलू शकणार नाहीत."

उच्चउपायुक्तांच्या अनुपस्थितीत भेट
"या भेटीदरम्यान, भारताचे उच्चउपायुक्त कुटुंबीयांसोबत होते. त्यांना न सांगताच, आई-पत्नीला मागच्या दरवाजाने भेटीसाठी नेलं.  त्यामुळे दोघींचे कपडे बदलल्याचं, तसंच मंगळसूत्र, टिकली काढल्याचं त्यांना समजलं नाही. नाहीतर त्यांनी तिथेच विरोध केला असता. त्यांच्या अनुपस्थितीत भेटीला सुरुवात झाली. थोड्यावेळाने त्यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना बैठकीसाठी नेलं," असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

मीडियाने अपमान केला
स्वराज पुढे म्हणाल्या की, "भेटीनंतर जी कार कुटुंबीय आणि अधिकाऱ्यांना दिली होती, ती जाणीवपूर्वक थांबवून ठेवली होती. जेणेकरुन पाकिस्तीना मीडियाला आई आणि पत्नीला त्रास देण्याची संधी मिळावी. त्यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी करता यावी."

पाकिस्तानलाच चिप कशी आढळली?
"भेटीआधी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला चप्पल काढलाय लावली आणि पाकिस्तानकडून चप्पल देण्यात आली होती. पण भेट संपल्यानंतर चप्पल मागूनही पाकिस्तानने त्यांच्या पत्नीला चप्पल दिली नाही. यामध्ये पाकिस्तानी अधिकारी कुरापती करण्याच्या तयारीत असल्याचं आम्हाला जाणवलं. दोन दिवस बातम्या सुरु आहेत, कधी सांगतात चप्पलमध्ये कॅमेरा होता, चिप होती, कधी रेकॉर्डर असल्याचं सांगितलं. पण हीच चप्पल घालून जाधव यांच्या पत्नीने दोन विमानातून प्रवास केला. इथून एअर इंडियाच्या विमानाने दुबई आणि दुबईतून एमिराईट्सच्या विमानातून इस्माबादेत गेल्या. त्यावेळी तपासणीत काहीही आढळलं नाही, मग पाकला कॅमेरा, चिप कुठे सापडली," असा सवाल सुषमा स्वराज यांनी विचारला.

भेटीत जाधव कुटुंबांच्या अधिकाराचं उल्लंघन
निवेदनात पाकिस्तानचा निषेध करताना सुषम स्वराज म्हणाल्या की, "कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचं पाकिस्तान सांगत आहे. पण खरंतर या भेटीत मानवताही नव्हती आणि सद्भावनाही. या भेटीत केवळ जाधव कुटुंबाच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होतं. भयभीत करणारं वातावरण तिथे निर्माण केलं होतं. त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. या सदनाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील लोक पाकिस्तानच्या नापाक कृतीचा निषेध करुन जाधव यांच्या कुटुंबासोबत सहानुभूतीने उभे राहतील, अशी अपेक्षा आहे."

विरोधकांकडून सरकारचं समर्थन
काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांनीही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निवेदनाला समर्थन दिलं. कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. पाकिस्तानात लोकशाही नाही आणि आम्ही पाकिस्तानला चांगलं ओळखतो. जाधव यांच्या आई-पत्नीसोबत जे घडलं, तो संपूर्ण देशाचा अपमान आहे, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

सुषमा स्वराज यांच्या निवेदनातील मुद्दे

मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही - सुषमा स्वराज

मानवतेच्या नावे भेट देण्याचं ठरलं, मात्र या भेटीत मानवता आणि सद्भावनेचा अपमान झाला : सुषमा स्वराज

जाधव कुटुंब भारतातून दुबईत, तिथून दुबईच्या विमानाने पाकमध्ये गेले, त्यावेळी तपासणीत काहीही आढळलं नाही, मग पाकला कॅमेरा, चीप कुठे सापडली? : सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना त्रास होईल, असे वर्तन पाक मीडियाने केले - सुषमा स्वराज

भारतीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत, त्यांना अंधारात ठेवून, कुलभूषण यांच्या आई- आणि पत्नीला मागच्या दरवाजाने भेटीसाठी नेण्यात आलं : सुषमा स्वराज

आई आणि पत्नीला विधवेच्या रुपात कुलभूषण जाधव यांच्या समोर पाकिस्तानने नेलं - सुषमा स्वराज

पाकने आईचं मंगळसूत्र आणि टिकली उतरवली, ते पाहून कुलभूषण यांनी आईला पहिला प्रश्न विचारला, बाबा कसे आहेत? : सुषमा स्वराज

पाकिस्तानी मीडियाने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचं अपमान केला : सुषमा स्वराज

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला : सुषमा स्वराज

सुरक्षेच्या कारणास्तव पाकने कुलभूषण जाधव यांच्या आईला साडीऐवजी सलवार-कमीज परिधान करायला लावलं - सुषमा स्वराज

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाशी सातत्याने संपर्कात - सुषमा स्वराज

पाहा व्हिडीओ