Parliament Monsoon Session 2023: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा (Parliament Monsoon Session 2023) आज, शुक्रवारी (11 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यावेळी संपूर्ण अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) चर्चेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभागृहनेते अधीर रंजन चौधरी यांना गुरुवारी (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींवर असंसदीय वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे संसदेत आजचा पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.


लोकसभेतील आपले नेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं आपल्या लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे. सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 10.30 वाजता संसदेतील त्यांच्या कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे. जाणून घेऊयात, संसदेच्या कामकाजासंदर्भातील  मोठ्या गोष्टी... 


पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज, जाणून घ्या अपडेट्स 


मणिपूरच्या चर्चेवरून राज्यसभेत सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष यांच्यात गोंधळ सुरूच आहे. विरोधक मणिपूरवर नियम 267 अंतर्गत दीर्घ चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर केंद्रानं नियम 176 अंतर्गत संक्षिप्त चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे.


राज्यसभेच्या सभापतींनी दोन्ही बाजूंनी प्रश्न सोडवण्याची विनंती केल्यानं गदारोळ होण्याची शक्यता आहे.


गुरुवारी (10 ऑगस्ट) लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर विरोधकांचा अविश्वास ठराव बारगळला होता. मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात हे विधेयक पंतप्रधान मोदींना घेरण्यासाठी आणल्याचा आरोप एनडीएनं केला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (10 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान संसदेत संबोधित केलं. मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.


पंतप्रधान मोदींनी काल संसदेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिलं. ते म्हणाले, मी ईशान्येतील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गेलो आहे. मी तिथे खूप काम केलं आहे. तिथल्या प्रत्येक ठिकाणाशी माझं भावनिक नातं आहे आणि मणिपूर माझ्या हृदयाचा तुकडा आहे. ते म्हणाले की, ज्या प्रकारे शांततेचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे लवकरच तेथे शांततेचा सूर्य उगवेल हे निश्चित आहे. 


पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इंडिया-इंडियाचा नारा देत सभागृहातून सभात्याग केला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी मणिपूर हिंसाचारावर बोलत नव्हते. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्याची दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे, मणिपूरला न्याय मिळवून देणं, दुसरं कारण म्हणजे, पंतप्रधानांना मणिपूर हिंसाचारावर बोलण्यास भाग पाडणं.


विरोधकांच्या वॉकआऊटचा समाचार घेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यात ऐकण्याची क्षमता नाही. शिवीगाळ करून पळून जाणं ही त्यांची जुनी सवय आहे. कचरा फेका आणि मग पळून जा. मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगतो की, त्यांच्या ऐकण्याची क्षमता नाही. असंच चालू राहिल्यास त्यांची संख्या निम्म्यावर येईल.


लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या भाषणातून पंतप्रधान मोदींसाठी वापरलेले शब्दही रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले आहेत. अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणातून पंतप्रधान मोदी आणि फरारी नीरव मोदी यांची तुलना करणारं वक्तव्य काढून टाकण्यात आलं आहे, तसेच ब्लाइंड किंग टॉक देखील काढून टाकण्यात आले आहे.


संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधीही सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयानं नुकतंच त्यांचे सदस्यत्व बहाल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.


संसदेच्या याच अधिवेशनात गदारोळ होऊनही दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात आलं. आम आदमी पक्षानं हे विधेयक मंजूर करण्यास विरोध केला होता. ते म्हणाले होतं की, हे विधेयक लोकशाहीचा खून करणारं विधेयक आहे. पंतप्रधान मोदींना देशात हुकूमशाही लागू करायची आहे.


या अधिवेशनात डेटा संरक्षण विधेयकही मंजूर करण्यात आलं आहे. एखाद्या नागरिकाच्या डेटाचं उल्लंघन झाल्यास या उल्लंघन करणाऱ्या कंपनीला 250 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याबाबत हे विधेयक बोलतं. या विधेयकाच्या मसुद्याबाबत खासगी कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र विधेयक मंजूर झाल्यानंतर कोणीही आक्षेप घेतलेला नाही.