बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली. तसेच, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचंही एसआयटीने म्हटलं आहे.


गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या तिघांच्याही हत्येत एकाच शस्त्राचं वापर करण्यात आलं आहे, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.



वाघमारे याने गौरी लंकेश यांना गोळी मारली. तसेच, याच शस्त्राने गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांचीही हत्या करण्यात आली. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या, त्या गोळ्यांच्या मागील बाजूस एकसारख्याच खुणा आढळल्या, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेले हे शस्त्र मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटानेच लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या केल्या. सुजीतकुमार उर्फ प्रवीण या गटासाठी भरती करायचा. या गटात किमान 60 जण कार्यरत आहेत, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्याने दिली.

तसेच, या निनावी गटातील अनेकजण हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेशी संबंधित आहेत. मात्र सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांचा सहभाग असला, तरी या दोन संस्थांचा या हत्यांशी थेट संबंध आहे का, याबाबत अजूनतरी पुरावे हाती लागलेले नाहीत, असेही एसआयटीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गौरी लंकेश यांची हत्या
5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्याच घराबाहेर हत्या झाली होती. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, तर एक गोळी त्यांच्या कपाळावर लागली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व साहित्यिकांनीही याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.

कोण होत्या गौरी लंकेश ?
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.

2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.