जयललिता यांची निकटवर्तीय शशिकला नटराजन मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पन्नीरसेल्वम यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत जाहीरपणे सांगितलं. शिवाय राज्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, तर राजीनामा मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शशिकला नटराजन यांचा शपथविधी बुधवारी होणार नाही, अशी माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे त्यांचा शपथविधी होईपर्यंत पन्नीरसेल्वमच मुख्यमंत्री राहतील, हे स्पष्ट झालं होतं. मात्र पन्नीरसेल्वम अम्मांच्या समाधीस्थळी जाऊन ध्यानमग्न झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा पारा एकदमच चढला होता.
अपोलो रुग्णालयात अम्मांवर उपचार चालू होते, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं होतं. इच्छा नसतानाही पक्षासाठी मुख्यमंत्री झालो. मात्र शपथविधी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसातच शशिकला यांच्या पुतण्याने शशिकला पक्षाच्या महासचिव व्हाव्यात, अशी इच्छा बोलून दाखवली होती, असा खुलासाही पन्नीरसेल्वम यांनी केला.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्यासाठी पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली.
आपण मुख्यमंत्री व्हावं, अशी पन्नीरसेल्वम यांचीच इच्छा होती, असा दावा शशिकला यांनी केला होता. मात्र आता पन्नीरसेल्वम यांच्या खुलाशाने एकच खळबळ माजली आहे.
कोण आहेत शशिकला?
शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची…
आजवर पडद्याआड वावरणाऱ्या शशिकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :