नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशाला लुटणारेच नोटाबंदीला विरोध करत असल्याचा मोदी म्हणाले. तसेच निवडणुकीवरुन राजकारण करु पाहणाऱ्यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्हाला निवडणुकीची नव्हे, तर देशाची चिंता असल्याचं, वक्तव्य त्यांनी लोकसभेत केलं


नोटाबंदीच्या निर्णयाची योग्य वेळ

मोदी पुढे म्हणाले की, ''नोटाबंदीचा निर्णय घेण्याची वेळ अतिशय योग्य होती. कारण आपल्या अर्थव्यवस्थेला ठिक करण्यासाठी जी शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्यासाठीची वेळ अतिशय योग्य होती.'' असं ते म्हणाले.

राहुल गांधींना चिमटे

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवातीला अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन चिमटे काढले. ''राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी मी जर बोलू लागलो, तर भूकंप येईल असं वक्तव्य केलं होतं. वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती घोटाळ्यांमध्येही सेवा भाव दाखवू लागतात. त्यावेळी त्यांची जन्मदाती आईच नव्हे, तर धरणी माताही दु: खी होते, आणि त्यांनतर भूकंप येतो.''

सर्जिकल स्ट्राईकवरुन काही नेत्यांना यूटर्न घ्यावा लागला

सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, ''सर्जिकल स्ट्राईकमुळे अनेक नेत्यांची अडचण झाली. त्यांनी तोंडला येईल ती वक्तव्ये केली. पण सर्जिकल स्ट्राईकवरील जनभावना पाहून अनेक नेत्यांना यूटर्न घ्यावा लागला.''

म्हणून गरीब आईचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला!

यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मोदी म्हणाले की, ''काँग्रेसमधील लोकशाही फार मोठी आहे. त्यांच्या लोकशाहीने कशाप्रकारे एकाच कुटुंबापर्यंत मार्यादित ठेवलं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. 1975 मधील आठवणी अजूनही ताज्या आहेत. जेव्हा संपूर्ण देशाला एखादी कोठडीच बनवली होती. त्यामुळे जनभावनेमुळेच लोकशाही देशात जीवंत आहे. याच शक्तीच्या जोरावर एका गरिब आईचा मुलगा पंतप्रधान बनू शकला.''