पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी संपुष्टात आला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बरोबरच सरकारचे भवितव्य पणाला लागलेले आहे.


उद्या मतदान, 28 ऑगस्टला मतमोजणी

दोन्ही मतदारसंघात मिळून 51 हजार मतदार 7 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. आज दुपारी अधिकारीवर्गाने मतदानकेंद्रावर जाऊन यंत्रणा उभी केली. उद्या (बुधवार, 23 ऑगस्ट) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून 28 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

पर्रिकरांसह राणेंची प्रतिष्ठा पणाला

पणजी मतदारसंघात एकूण चार उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणूक दुरंगी अर्थात भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्यात होणार आहे. वाळपईतही एकूण 3 उमेदवार असले तरी भाजपचे उमेदवार आरोग्यमंत्री विश्वजित राणे व काँग्रेसचे उमेदवार रॉय नाईक यांच्यात सामना रंगणार आहे.

कुठल्या मतदारसंघात किती मतदार?

पणजी मतदारसंघासाठी एकूण 30 मतदानकेंद्रांची स्थापना करण्यात आली असून वाळपईकरिता 46 मतदानकेंद्रे आहेत. पणजीत एकूण 22 हजार 196 मतदार असून त्यात पुरुष 10 हजार 640 तर 11 हजार 556 महिला मतदारांचा समावेश आहे. वाळपईत एकूण 28868 मतदार असून त्यात पुरुष 14 हजार 340 तर महिला 14 हजार 528 यांचा अंतर्भाव आहे. दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असून पणजीत हे प्रमाण 900 च्या आसपास आहे. वाळपईत 150 महिला मतदार अधिक आहेत.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

निवडणुकीनिमित्ताने सोमवारी सायंकाळपासून कोरडे दिवस सुरू झाले असून ते मतदान होईपर्यंत चालू राहणार आहेत. पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठी बुधवार 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पणजी शहरातील अनेक मतदार चतुर्थीसाठी मंगळवारी 22 रोजीच आपल्या मूळ घरी जाणार असल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. कारण पणजीतील अनेक मतदार चतुर्थीची तयारी करण्यासाठी मूळ घरी जातात. वाळपईमध्ये मात्र तशी शक्यता दिसून येत नाही.

निवडणूक यंत्रण सज्ज

अनेक ठिकाणी मतदानकेंदाची तयारी पूर्ण करण्यात येत असून काही ठिकाणी केंद्राबाहेर मंडप घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी निवडणूक अधिकारी मतदानयंत्र व इतर सामुग्री घेऊन मतदानकेंद्राकडे रवाना झाले आहोत. मतदान केंद्राबरोबर मतदारांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून मतदान करण्याकरिता मतदान यादीत नाव असणे व ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र, वोटरस्लीप किंवा इतर ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. मतदानकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दोन्ही मतदारसंघासाठी मिळून एकूण 800 सरकारी कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आले असून त्याशिवाय सुमारे 200 पोलीस मतदानकेंद्रावरील बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.