Seema Sachin Love Story : पाकिस्तानच्या सीमा हैदर (Seema Haider) ची सर्वात आधी पोलिसांनी चौकशी केली, त्यानंतर आता उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून यासंदर्भात चौकशी सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात सीमा हैदरने वारंवार जबाब बदलल्याचं निदर्शनास आलं आहे. तिने चौकशीदरम्यान अनेकदा वक्तव्ये बदलल्याचे पाहायला मिळत आहे. लखनौ डीजीपी मुख्यालयाकडून जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, सीमा हैदरने उत्तर प्रदेशमधील सोनौली सीमेवरून नव्हे तर सिद्धार्थनगरमधील रूपनदेही-खुनवा सीमेवरून भारतात प्रवेश केला होता. एवढेच नाही तर सीमाने सचिनशी पहिल्यांदा संवाद 2020 मध्ये साधला. पण सीमाने चौकशीदरम्यान 2019 मध्ये दोघांमध्ये चॅट झाल्याचं सांगितलं होतं.
पाकिस्तानी सीमा हैदर वारंवार बदलतेय जबाब
प्रेमासाठी पाकिस्तानातून सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमा हैदरची पोलीस आणि एटीएस सातत्याने चौकशी करत आहेत. सध्या सीमा हैदर उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी (UP ATS) पथकाच्या ताब्यात आहे. सीमा हैदर प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीमा हैदरने यापूर्वी जेवार न्यायालयात सांगितलं होतं की, सीमा आणि सचिनने नेपाळमधील पशूपती नाथ मंदिरात लग्न केले होतं. याच आधारावर सीमा हैदरला कोर्टातून जामीन मिळाला होता. पण, आता नेपाळमधील पशूपती नाथ मंदिराची देखरेख करणाऱ्या पशुपती क्षेत्र विकास निधीचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशूपती नाथ मंदिरात विवाह होत नाहीत. मंदिरात किंवा अंगणात लग्नाला परवानगी नाही.
भारतात नेमक्या कोणत्या मार्गाने आली सीमा
राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी भारत-नेपाळ सीमेवरील सोनौली सेक्टर आणि सीतामढी सेक्टरमध्ये कोणत्याही इतर राष्ट्राच्या नागरिकाच्या उपस्थिती किंवा प्रवेशाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या दोन्ही ठिकाणांहून सीमा हैदर आणि सचिन यांनी भारतात प्रवेशाचा दावा केला होता. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीमा हैदर कुठेही दिसली नाही. नियमानुसार, भारत-नेपाळ सीमेच्या या किंवा त्या बाजूने तिसऱ्या देशाचा नागरिक गेल्यास दोन्ही देशांचे पोलीस एकमेकांना त्याची माहिती देतात, पण भारतीय पोलिसांना अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.
सीमा आणि सचिनने रचली खोटी कहाणी
सचिनसोबत पहिल्यांदा चॅट, भेट, भारतात प्रवेश आणि लग्न या सर्वच बाबतीत सीमा खोटं बोलत असल्याचं समोर आलं आहे. यावरून पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनी खोटी कहाणी रचल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सीमा हैदर आणि सचिन हे नेपाळमधील न्यू विनायक हॉटेलच्या खोली क्रमांक 204 मध्ये बनावट नावं आणि पत्त्यांसह राहत असल्याचंही तपासात समोर आलं आहे. तिथे सीमाने स्वत:ला भारतीय आणि सचिनची पत्नी असल्याचं सांगितलं होतं. हॉटेलच्या रजिस्टरमध्येही या दोघांनी खोट्या नावाने नोंद केली होती.
सीमा इतर भारतीय पुरुषांच्याही संपर्कात होती
सचिन एक दिवस आधी नेपाळला पोहोचला होता, तर सीमा दुसऱ्या दिवशी नेपाळला पोहोचली होती. सीमा हैदरने एटीएसच्या चौकशीत कबूल केले की, सचिन व्यतिरिक्त ती इतर भारतीय पुरुषांच्या संपर्कात होती. PUBG गेम खेळताना सीमाने या लोकांशी ओळखही करून घेतली होती. सीमाने ज्या लोकांशी संपर्क साधला ते बहुतेक दिल्ली-एनसीआरमधील होते. सीमा ज्या लोकांशी PUBG च्या माध्यमातून बोलली त्यांचाही शोध घेतला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :