नवी दिल्ली : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज सकाळी मुंबई, दिल्लीतल्या मशींदीमध्ये नमाजपठणासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही आज बकरी ईद साजरी केली जात आहे. त्याचबरोबर देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवानदेखील ईद साजरी करत आहेत.

वाघा-अटारी सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांनी तिथल्या पाकिस्तानी रेंजर्सना ईदनिमित्त मिठाई देऊ केली. परंतु पाकिस्तानी रेंजर्सनी ती मिठाई घेण्यास नकार दिला.

तर दुसऱ्या बाजुला भारत-बांग्लादेश सीमेवर बकरी ईदचा जल्लोष पाहायला मिळाला. भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) आणि बांग्लादेशच्या बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशच्या जवानांनी एकमेकांना मिठाई देऊन ईद साजरी केली. यावेळी सैनिकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.