चंदीगड : एका पाकिस्तानी नागरिकाला भारतीय मुलीवर प्रेम झालं आणि तो तिच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आला. दोघांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगाही झाला, पण ही प्रेम कहाणी इथेच संपली आहे. कारण पाकिस्तानी नागरिकाला आता त्याच्या पत्नी आणि मुलाला भारतातच सोडून पाकिस्तानमध्ये पाठवलं जात आहे.

31 वर्षीय अकबर दुर्रानी यांची प्रेम कहाणी एखाद्या सिनेमाप्रमाणेच आहे. पाकिस्तानमधील हैदराबाद येथील ओखरीचे नागरिक दुर्रानी यांच्या पाच वर्षांच्या प्रेमाचा प्रवास जवळपास संपत आला आहे. त्यांना ठराविक काळापेक्षा जास्त दिवस भारतात राहिल्याने व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येणार आहे.

फेसबुकवरुन भारतीय मुलीशी ओळख

मध्य प्रदेशमधील देवास येथील सोफियाशी दुर्रानी यांचा फेसबुक आणि स्काईपच्या माध्यमातून संपर्क आला. ओळख वाढत गेली आणी या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे सोफियाशी लग्न करण्यासाठी दुर्रानी त्यांच्या आईला घेऊन भारतात आले.

'ती' अट मान्य करुन लग्न

दुर्रानी यांनी मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर सोफियाच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि ते लग्नासाठी तयार झाले. पण त्यांनी लग्नानंतर भारतातच रहावं लागेल, अशी अट दुर्रांनींसमोर ठेवली. ती अटही त्यांनी मान्य केली.

2013 साली दुर्रानी आणि सोफिया यांचं लग्न झालं आणि एका वर्षात त्यांना एक मुलगा झाला. पण दुर्रानी पर्यटक व्हिजावर भारतात आले होते. दीर्घकाळ व्हिजाच्या मागणीसाठी त्यांनी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात (एफआरआरओ) अर्ज केला.

व्हिजा नियम उल्लंघन प्रकरणी तुरुंगवास

दुर्रानी यांनी व्हिजा संपण्याअगोदर दोन महिने अर्ज केला. 'ज्या दिवशी व्हिजाची तारीख संपली त्या दिवशी अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी एफआरआरओ कार्यालयात गेलो पण तिथे गेल्यानंतर व्हिजापेक्षा जास्त काळ भारतात राहिल्याचं सांगत अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आलं', असं त्यांनी सांगितलं.

एक वर्षाचा तुरुंगवास

ऑगस्ट 2015 मध्ये दुर्रानी यांना व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 8 ऑगस्ट 2015 रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि पाकिस्तान उच्च आयोगाच्या प्रवास कागदपत्रांसाठी त्यांना एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. यामध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला.

पत्नी आणि मुलाला पाकिस्तानमध्ये परवानगी नाकारली

दुर्रानी यांच्या प्रेम कहाणीत सर्वात दुःखद गोष्ट अशी की त्यांच्या मुलाला आणि पत्नीला पाकिस्तानमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

''माझी पत्नी आणि मुलगा मला सोडण्यासाठी अमृतसरला आले आहेत.


त्यांना माझ्याशिवाय भारतात राहणं अशक्य होणार आहे.


शिवाय पाकिस्तान उच्च आयोग त्यांना पाकिस्तानमध्ये येण्यासाठी व्हिजा देईल,


याची काहीही खात्री नाही आणि मी व्हिजा नियमांचं उल्लंघन केल्याने मला पुन्हा भारताचा व्हिजा मिळणार नाही'',


अकबर दुर्रानी.