या प्रकरणी जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांनीही या वादात उडी घेतली आहे. ट्विटरवरुन या दोघांनीही याप्रकरणी आपली मतं मांडली आहेत.
अनुपम खेर म्हणाले की, 'असहिष्णु गँग परत आली आहे, चेहरे तेच आहेत फक्त घोषणा बदलल्या आहेत.'
फक्त अनुपम खेरच नाही तर गीतकार जावेद अख्तर यांनीही याप्रकरणी ट्वीट केलं आहे. जावेद अख्तर यांनी गुरमेहरवर टीका करणाऱ्या पैलवान बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
जावेद अख्तर यांनी ट्विट केलं, 'काही कमी शिकलेले खेळाडू आणि पैलवान शहीदाच्या मुलीला ट्रॉल करु शकतात हे मी समजू शकतो. पण काही शिकल्या-सवरलेल्या लोकांना काय झालं आहे?'
जावेद अख्तर यांच्या ट्विटनंतर त्यांना अनेकांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं. जावेद अख्तर यांच्या ट्विटला उत्तर देताना बबिता फोगाट म्हणाली की, 'शाळेत जाण्याच्या आधीपासून मी 'भारत माता की जय' बोलते आहे, देशभक्ती पुस्तकातून येत नाही.'
जावेद अख्तर यांच्या ट्विटवर दिग्दर्शक मधुर भंडारकरनंही ट्विट केलं आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अशिक्षित याचं काहीही देणघेणं नाही. मी एक सहावी नापास विद्यार्थी आहे. पण तरीही माझं मत मांडण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही.'
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावरून कथितपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सदस्यांकडून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हिने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमेहर कारगिल युद्धातील शहीज जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे.
दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने फेसबुकवर टाकला होता.
गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असं वक्तव्य गुरमेहरने केलं होतं. या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला.
वादात राहुल गांधींची उडी
गुरमेहर कौरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
संबंधित बातम्या: