नवी दिल्ली : दिल्ली ते मुंबई हा प्रवास एक तासापेक्षाही कमी वेळेत होईल, असा विचारही कुणी केला नसेल. पण लवकरच हायपरलूप वन ट्रेनने हे शक्य होणार आहे. दिल्ली ते मुंबई हा प्रवास केवळ 55 मिनिटात करता येऊ शकतो, असा प्रस्ताव कंपनीने दिला आहे.


जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवणारी कंपनी हायपरलूप वनने 'भारतासाठी हायपरलूप वन व्हिजन' या संमेलनाचं आयोजन केलं होतं. या संमेलनात कंपनीने दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 55 मिनिटात कापता येईल, असा दावा केला.

या कार्यक्रमात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचीही उपस्थिती होती. यावेळी भारतातील पहिली हायपरलूप वन ट्रेन विकसित करण्यावर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारताला बदलण्याचं स्वप्न आणि त्यासाठी तंत्रज्ञानाकडे ते ज्या पद्धतीने पाहतात, ते उल्लेखनीय आहे. भारताचं भौगोलिक क्षेत्र हायपरलूप वनसाठी योग्य आहे. शहरं जोडणं हे हायपरलूप वनचं ध्येय आहे आणि पंतप्रधान मोदींचंही हेच ध्येय आहे. त्यामुळे मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या भारताच्या उपक्रमात हायपरलूप भाग घेईल, असं कंपनीचे अध्यक्ष शेरविन पिशेवर यांनी म्हटलं.

हायपरलूप वन ट्रेनने भारताच्या पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी मदत होईल. हायपरलूप वन प्रणालीमुळे सध्याच्या पायभूत सुविधांवरील दबाव कमी होऊन सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. जगभरातील विविध सरकारसोबत हायपरलूप हे काम करत आहे आणि भारतातही असं काम करण्यासाठी उत्सुक आहोत, असं हायपरलूप वनचे कार्यकारी अधिकारी रोब लॉयड यांनी सांगितलं.

या कंपनीने भारतातील अन्य काही मार्गांवरही हायपरलूप वन चालवण्याचे प्रस्ताव दिले. यामध्ये बंगळुरू ते चेन्नई, बंगळुरू ते तिरुवअनंतपुरम, मुंबई ते चेन्नई आणि बंगळुरू ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे.