नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानची भूमिका सध्या बदलली आहे. पाकिस्तान येथील कारागृहात असणाऱ्या जाधव यांना व्हिएन्ना करारानुसार आवश्यक ती वकिलांची मदत करण्यास पाकिस्तान तयार झाला आहे. पाकिस्तानी कायदा आणि व्हिएन्ना करारानुसार आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने मध्यरात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असून जाधव यांच्या सुटकेची मागणी भारताने केली होती. परंतु सर्व नियम पायदळी तुडवित पाकिस्तानने जाधव यांची बेकायदेशीर अटक केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. जयशंकर म्हणाले, २०१७ साली जाधव यांच्या सुटकेसाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील कायद्याने जाधव यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणला जात आहे. कुलभूषण जाधव यांची सुटका व्हावी यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानकडे मागणी करणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निणर्यानंतर पाकिस्तानची भूमिका काहीशी मवाळ झाली असली तरी, जाधव यांना शिक्षा होणारचं या मतावर पाकिस्तान ठाम आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी याविषयी टिवट् केले आहे. इमरान खान म्हणाले, जाधव हे पाकिस्तानचे दोषी आहेत. कायद्यानुसारच जाधव यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला 17 जुलै रोजी जाधव यांच्या फाशीच्या निर्णयाला स्थगती देण्याचे आदेश दिले होते. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना 2017 साली  दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती